Intent

Showing posts with label KARNA. Show all posts
Showing posts with label KARNA. Show all posts

Tuesday, February 2, 2021

मृत्युंजय (कादंबरी)

https://amzn.to/3cyUtxt


 महाभारतातील 'कर्ण' या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी. सप्टेंबर २४ १९९५ रोजी या पुस्तकाला 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला.


महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित "मृत्युंजय " कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे वर रेखाटलेल्या चित्रावरून सिद्ध झालेच. अशा अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते ही कादंबरी.… मराठी साहित्यास शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली आणखी एक देणगी.

कुरुक्षेत्रावर सुरु असलेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाचा तो सतरावा दिवस. वेळ जवळ जवळ सूर्यास्ताची. कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील योद्धे सारे स्तब्ध उभे. समोर जमिनीवर रक्तात न्हालेला महावीर कर्ण मृत्युच्या शेवटच्या घटका मोजत. इथे कर्ण मृत्युच्या दारात आणि आसपास सभोवताली पडला होता मृत सैनिकांचा रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच.… इथे कर्णाचा शेवट पहात उभ्या योध्यांची मुग्ध शांतता आणि चहूकडे फक्त आकांत… त्या सैनिकांच्या स्वकीयांचा. कर्ण आपल्या मावळत्या पित्याला शेवटचा निरोप देत असतानाच त्याचे लक्ष वेधले गेले … एका पित्याच्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे … एका दीर्घ आकांताकडे … एका करुणामयी विनवणीकडे.

                 " अरे या कुरुक्षेत्रावर कोणी आहे का मला मदत करणारा. युद्धात मुलगा मारला गेला माझा. त्याच्या अंतिम कार्यासाठीही द्रव्य नाही माझ्याकडे. कोणी आहे का ? "

ही मदतीसाठी मारलेली हाक दानवीर कर्णाने ऐकली आणि त्याने त्या याचकास जवळ बोलावले. त्याला इच्छा विचारली तेव्हा खरेतर त्या याचकास देण्यासाठी त्या क्षणी कर्णाकडे स्वतःकडे काहीच द्रव्य नव्हते. पण तरीही कर्णाने आपला दानधर्म न त्यागता आपल्या मुलास जवळ बोलावले आणि त्या जखमी स्थितीतही तो म्हणाला,

                " पुत्रा , आयुष्यभर जे मजपाशी होते ते ते सर्व जेव्हा जेव्हा ज्याने मागितले मी त्यास दिले. पण         आज हा याचक असाच रिकाम्या हाताने माझ्यापाशी येऊन परत जाणार हे कदापि शक्य नाही. तू एक काम कर . तो पडलेला जमिनीवरचा दगड घे आणि माझ्या तोंडात असलेले हे २ सोन्याचे दात पाड आणि या दुःखी पित्यास दे . त्याच्या मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी ते त्याच्या कामा येतील. "

आपल्या यमसदनी निघालेल्या पित्यासोबत असे निघृण कृत्य करण्यास न धजावणाऱ्या पुत्रास पाहून शेवटी कर्णाने त्यास तशी आज्ञा केली. तेव्हा रडत रडतच दुःखी अंतःकरणाने त्या पुत्राने आपल्या पित्याची ती आज्ञा मानली आणि दगडाच्या घावांनी कर्णाचे तोंड रक्तबंबाळ केले. त्या रक्तवर्णात मोतीमाळेतून अचानक निखळून गळावे तसे २ चमचम करणारे सुवर्णदातही लालसर झाले होते. असे दान कसे दयावे ? हा विचार करत कर्णाने त्यांस आपल्या डोळ्यांपाशी नेले . त्या नयनकमलांतून वाहणाऱ्या अश्रूजलात न्हाऊन पवित्र झालेले रद रेशीम कापडाने पुसून घेत हे शेवटचे दान त्या याचकास सुपूर्द करत कर्णाने कायमचे डोळे मिटले.